अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. भाजपच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर त्याला उत्तर म्हणून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनीही विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणा दिल्या. मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांचा सत्ताधाऱ्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या मागणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायलाच हवा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
राज्याच्या इतिहासात असे कधीच घडलेले नाही. अटकेत असलेला मंत्री अद्याप पदावर कायम आहे. आमची अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आहे. त्यांनी मलिक यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. बाळासाहेब ठाकरे असते तर, एका मिनिटांत त्यांची हकालपट्टी केली असती, असे फडणवीस म्हणाले.
नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा. संजय राठोड यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर घेतला. पण मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना, नेमके मलिकांना वाचवण्याचे कारण काय? त्यांच्यामागे कोण आहेत? कुणाच्या दबावाखाली मलिक यांना वाचवले जातेय? हा प्रश्न आम्ही विचारणार आहोत. आम्ही सरकारला जाब विचारला आहे. सरकार पळ काढतंय, त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. हे दाऊद समर्पित सरकार आहे, दाऊद शरण सरकार आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.