अमोल मिटकरी हे गुरुवारी विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. या अधिवेशनात भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही छातीचा कोट करून लढू. भाजपला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भाजपवाल्यांनी आमची कितीही कोंडी केली तर, त्यांना जड जाणार आहे. भाजपने कितीही फ्रंटफूटवर येऊन बँटिंग करू दे, आमचे फुलटॉस बॉल तयार आहेत. त्यामुळे भाजपला करारा जवाब मिळेल, असेही मिटकरी यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपनं लावून धरली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कमालीचे आक्रमक झाले होते. अटकेत असलेला मंत्री अद्याप पदावर कसा? असा सवाल त्यांनी विचारला. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी एका मिनिटांत मलिक यांची हकालपट्टी केली असती, असं फडणवीस म्हणाले. संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांचा राजीनामा घेतला. पण नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत, त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. मग नवाब मलिक यांना कोणाच्या दबावामुळे वाचवलं जात आहे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.