नागपूर: पॅरोलवर कारागृहातून सुटताच कुख्यात गुंडाने पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली, तर मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गाडगेनगर भागात घडली. सुशिला अशोक मुळे ( वय ५२) असे मृत महिलेचे तर, त्यांचा मुलगा नवीन (वय ३० दोन्ही रा. गाडगेनगर) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी मारेकरी नवीन सुरेश गोटाफोडे याच्याविरुद्ध हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक मुळे हे गुन्हे शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. अशोक यांचा मुलगा नवीन हा गोटाफोडे याचा बालपणीचा मित्र आहे.

शनिवारी सकाळी गोटाफोडे हा नवीन याच्या घरी गेला. नवीनबाबत विचारणा केली. नवीन हा घरी नसल्याचे सुशिला यांनी गोटाफोडे याला सांगितले व स्वयंपाक घरात गेल्या. त्यामुळे गोटाफोडे संतापला. तो थेट स्वयंपाक घरात घुसला. स्वयंपाक घरातील चाकू उचलून त्याने सुशिला यांचा गळा चिरला. आवाजाने सुशिला यांचा मुलगा नवीन हा मदतीसाठी धावला. गोटाफोडे याने नवीन याच्या शरीरावरही चाकूने सपासप वार केले व पसार झाला. आरडाओरड झाल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. जखमींना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सुशिला यांना मृत घोषित केले. नवीन मुळे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोटाफोडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

चार दिवसांपूर्वीच आला कारागृहातून बाहेर

गोटाफोडे याने डिसेंबर २०१७मध्ये एका युवकाची हत्या केली होती. एका चोरी प्रकरणात तो कारागृहात होता. करोनामुळे सरकारने नागपुरातील काही गुंडांची पॅरोलवर सुटका केली. यात गोटाफोडेचाही समावेश होता. चार दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here