चोपडा तालुक्यातील बीडगाव येथे विनोद विक्रम बाविस्कर (कोळी, वय ४० ) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. विनोद बाविस्कर यांचा त्यांच्या आई, वडील, भाऊ यांच्यासोबत काल रात्री आर्थिक कलहातून वाद झाला. या भांडणाच्या तणावामुळे विनोद बाविस्कर यांनी घरातील विषारी द्रव्य प्राशन केले. या घटनेत विनोद बाविस्कर यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तत्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सदर माहिती त्यांची पत्नी वर्षा विनोद बाविस्कर यांना समजल्याने त्यांना या घटनेचा धक्का बसला. वर्षा बाविस्कर यांनी कुठलाही विचार न करता किर्ती आणि मोनाली या मुलींसह बिडगाव शहरातील इकबाल शहादूर तडवी यांच्या मालकीच्या विहिरीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. त्यांची आणखी एक मुलगी खुशी ही मामाच्या घरी गेली असल्याने सुदैवाने ती बचावली आहे.
या घटनेबाबत आज सकाळी माहिती मिळाल्यावर स.पो.नि. किरण दांडगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह दत्तू पाटील व छोटू तडवी यांना सहाय्यतेसाठी घेत विहिरीत शोध मोहीम राबवली. यामध्ये ३ तासांच्या प्रयत्नानंतर दोन्ही मुलींचा मृतदेह हाती आला आणि त्यानंतर विहिरीतील पाण्याचा उपसा केल्यानंतर वर्षा बाविस्कर यांचा मृतदेह हाती आला. तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
दरम्यान, विष प्राशन केलेल्या विनोद विक्रम बाविस्कर यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.