दौंड : पत्नीच्या आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका युवकाने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने आपण जीवन संपवत असल्याचं सांगत आत्महत्येचा व्हिडिओही तयार केला. रुग्णालयात १४ दिवस उपचार घेतल्यानंतर तरुणाचा मृत्यूशी संघर्ष अयशस्वी ठरला आणि त्याने आपले प्राण गमावले. प्रशांत शेळके असं या तरुणाचं नाव आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Suicide Case)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीपार्धी येथील प्रशांत शेळके याचे भाग्यश्री पिसे हिच्याशी २०२१ मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यावर काही महिने सुरळीत गेल्यानंतर आपल्या पत्नीचे याआधीही एक लग्न झालं असून पहिल्या नवऱ्यापासून तिला एक मुलदेखील असल्याची माहिती प्रशांत याला मिळाली. पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी प्रकरण सुरू असताना तिच्या नातेवाईकांनी प्रशांतसोबत तिचं लग्न लावून दिलं. मात्र लग्न करताना पहिल्या लग्नाबाबत कोणतीच माहिती प्रशांतला देण्यात आली नव्हती. ही बाब समजल्यानंतर प्रशांतला धक्काच बसला आणि पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी ३० लाख रुपये देण्याची मागणी देखील केली जात होती, असा आरोप प्रशांतच्या नातेवाईकांनी केला आहे.

ukraine india : टेन्शन कायम! परराष्ट्र मंत्रालयाने खारकीव्हबाबत दिली ‘ही’ मोठी माहिती, PM मोदी भेटले विद्यार्थ्यांना

पत्नीच्या आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून १४ फेब्रुवारी रोजी प्रशांतने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विषारी औषध घेतल्याने त्याच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात १४ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मृत प्रशांतचे वडील विठ्ठल शेळके यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे. प्रशांतने विषारी औषध पिताना एक व्हिडिओही बनवला आहे. हा व्हिडिओ सध्या पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी पत्नी भाग्यश्री पिसे, सासू स्वाती दत्तात्रय पिसे, सासरे दत्तात्रय विठ्ठल पिसे, (रा. सर्व केडगाव, मूळ महर्षी नगर, ता. माळशिरस जि.पुणे) आणि प्रदीप नेवसे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केडगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here