devendra fadnavis: अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडायचंय, पण… ; देवेंद्र फडणवीस यांची आमदारांना महत्त्वाची सूचना – devendra fadnavis give important advice to bjp mla to tackle mva maharashtra budget session
मुंबई:महाविकासआघाडी सरकार आणि भाजप यांच्यात निर्माण झालेले टोकाचे वितुष्ट लक्षात घेता राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रत्येक दिवस वादळी ठरेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र, गेल्या अधिवेशनात भाजप आमदारांनी सरकारला घेरण्याच्या जोशात स्वत:चे निलंबन करवून घेतले होते. त्यामुळे या अधिवेशनात महाविकासआघाडीला अशी कोणतीही संधी द्यायची नाही, याची भाजपकडून पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडायचं आहे, पण हे करताना आपलं निलंबन होणार नाही, याची काळजी घ्या. महाविकासआघाडी तुमच्या निलंबनाची संधी शोधत असेल. पण यावेळी आपण संसदीय कामकाजाची सर्व आयुधं वापरत राज्य सरकारला कोंडीत पकडू. पण यादरम्यान निलंबन होईल, अशी कोणतीही कृती करू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना बजावले. (Maharashtra Budget Session Second Day) Vidhansabha LIVE: अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला, दुसऱ्या दिवशी मलिकांचा राजीनामा आणि ओबीसी आरक्षणावरून संघर्ष? देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गुरुवारी रात्री भाजप आणि मित्र पक्षातील सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनातील आगामी रणनीती निश्चित केली. त्यामुळे आता भाजपचे आमदार राज्य सरकारला घेरण्यासाठी काय काय करणार, हे पाहावे लागेल.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत घडलेल्या प्रकारामुळे भाजप काहीसा बॅकफूटवर गेला होता. पहिल्याच दिवशी सभागृहात नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करण्याची भाजपची रणनीती होती. मात्र, राज्यपाल कोश्यारी अभिभाषण अर्धवट सोडून गेल्यामुळे सर्वचजण बुचकाळ्यात पडले होते. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांच्या या कृतीवर टीका करायला सुरुवात केली होती. राज्यपाल राष्ट्रगीतासाठीही थांबले नाहीत, हा मुद्दाही महाविकासआघाडीच्या आमदारांनी उपस्थित केला होता. त्यामुळे पहिल्याच दिवशी अत्यंत आक्रमकपणे सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती तितकीशी यशस्वी ठरली नव्हती. मात्र, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपकडून या सगळ्याची कसर भरून काढली जाऊ शकते.