रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन आठ दिवस उलटलेत. रशियाला अत्यंत सोपा वाटलेला पेपर युक्रेनमध्ये मात्र कठीण ठरलाय. युक्रेनची राजधानी कीव्हवर अद्याप रशियाला ताबा मिळवता आलेला नाही. याच दरम्यान, अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना संपवण्याचं आवाहन केलंय. उल्लेखनीय म्हणजे, रशियन लष्कराला त्यांनी हे आवाहन केलंय.
‘रशियामध्ये कोणी ब्रुटस आहे का? रशियन सैन्यात कर्नल स्टॉफेनबर्ग यांच्याहून यशस्वी कुणी आहे का? रशियाच्या या दु:खद स्वप्नाचा अंत तेव्हाच होईल जेव्हा पुतीन यांना संपवलं जाईल. तुम्ही तुमच्या देशासाठी आणि जगासाठी उत्तम काम कराल’ असं अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणत पुतीन यांच्या हत्येची भाषा केलीय.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी सोशल मीडियावर केलेल्या उल्लेखानुसार, त्यांनी स्वत: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पुन्हा एकदा युक्रेनवरील हल्ले थांबवण्याची विनंती केली आहे. परंतु, पुतीन मात्र माघार घ्यायला तयार नाहीत.
युक्रेनच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला
दरम्यान, शुक्रवारी पहाटे रशियाकडून युक्रेनच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झापोरिझियाला वेढा घालण्यात आला. यानंतर अणुऊर्जा प्रकल्पातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसून आल्या.
युरोपातील सर्वात मोठ्या या अणु प्रकल्पाच्या प्रवक्ते आंद्रे तुझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण युक्रेनच्या एनरहोदर शहरातील पॉवर स्टेशनवर रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर या प्लान्टला आग लागली. झापोरिझिया अणुऊर्जा प्रकल्पाच्या भागात किरणोत्सर्गाची उच्च पातळी आढळून आली. याच प्रकल्पातून देशाला जवळपास २५ टक्के वीज पुरवली जाते. ही आग विझवण्यासाठी आणि विनाश टाळण्यासाठी हल्ले तत्काळ युद्ध थांबवण्याची गरज आहे, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली. एनरहोदर हे नीपर नदीवर वसलेलं एक शहर आहे. देशाच्या वीज निर्मितीच्या एक चतुर्थांश वाटा याच भागाचा आहे.
रशियन लष्करालाही मोठं नुकसान
युक्रेनसोबतच्या युद्धात रशियन सैन्यालाही मोठं नुकसान सहन करावं लागतंय. जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याची कमांड आपल्या हाती घेतली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या विशेष ऑपरेशन दरम्यान मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना ३५ लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा पुतीन यांच्याकडून करण्यात आलीय.
कालच या युद्धात आपल्या सैन्याचे जवळपास ५०० सैनिक मारले गेल्याची कबुली रशियानं अधिकृतपणे दिलीय. तर दुसरीकडे, आतापर्यंत ९००० सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आलाय.