>> ताराचंद म्हस्के, शिर्डी

करोना व्हायरस रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वच आघाड्यांवर कठोर पावले उचलली आहेत. राज्याचा उत्पादन शुल्क विभागाने परराज्यातील अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी चोहोबाजूच्या राज्य सीमांवर चौक्या उभारून तत्काळ नाकाबंदी करण्याचे आदेश या खात्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने तातडीने १८ सीमा तपासणी नाके उभारून अवैध दारू तस्करी प्रकरणी १२२१ गुन्हे नोंदविले असून त्यात ४७२ आरोपींना अटक केली आहे.

करोना रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक पावले उचलली आहेत. याविषयी बोलताना या खात्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, परराज्यातील अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी चोहोबाजूच्या राज्य सीमांवर कडक नजर ठेवण्यासाठी तत्काळ चौक्या उभारून नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने तातडीने १८ सीमा तपासणी नाके उभारले आहेत. या विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्या टीमने अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे.

गोवा, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, कर्नाटक व मध्य प्रदेशातून अवैध मद्य येणार नाही, याकरिता १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत. १८ तात्पुरत्या सीमा तपासणी नाक्यांवर पूर्ण नाकाबंदी करण्यात आलेली आहे. त्याद्वारे व्यापक कारवाई करण्यात येत आहे. २४ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत राज्यात एकूण १२२१ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात ४७२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ३६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण २ कोटी, ८२ लाख ३१, १०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्यनिर्मिती वाहतूक, विक्रीविरुद्धच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३, व्हाट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ तसेच ईमेल- commstateexcise@gmail.com वर कराव्यात, असे आवाहन राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here