मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून भर चौकातच दोन जणांमध्ये वाद सुरू झाला. वाद इतक्या विकोपाला गेला की, चालकाने कार अडवून वाद घालणाऱ्या तरुणाला फरफटत नेले. सुदैवाने या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. हा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी चौकात घडला. ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली आहे. मात्र, शहर पोलीस या प्रकरणात काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सिग्नलवर वाहने थांबली होती. इतक्यात एका कारसमोर अचानक दुचाकीस्वार येऊन उभा राहिला. त्याने कारवर लाथा मारायला सुरूवात केली. हा प्रकार तिथेच असलेल्या एका नागरिकाने बघितला. त्याने संपूर्ण घटना आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात टिपली. काही वेळाने सिग्नल ग्रीन झाल्यानंतर चालकाने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणाने कार अडवली. त्यानंतर चालकाने त्या तरूणाला कारवरून फरफटत नेले. कार पुढे काही अंतरावर गेल्यानंतर हा तरुण पुढच्या चाकाखाली जाता-जाता वाचला. हा सगळा थरार मोबाइल कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाहतूक पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन व्हिडिओच्या आधारे कार शोधून काढली आणि संबंधितावर गुन्हा दाखल केला. प्रवीण चौधरी असे या कार चालकाचे नाव आहे. प्रवीण याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्रिवेशला आहे. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याची माहिती त्रिवेशला मिळाली होती. त्याने आधारवाडी चौकात त्याला अडवून वाद घातला.