: मोहाली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंतने मोहाली कसोटीत धडाकेबाज खेळी केली, पण त्याचे शतक फक्त ४ धावांनी हुकले. पंत ९६ धावांवर असताना त्याला सुरंगा लकमलने त्रिफळाचित केले. लकमलचा चेंडू पंतच्या बॅटच्या आतील बाजूला लागला आणि तो चेंडू थेट स्टंपवर जाऊन धडकला. पंतने शतक झळकावले असते, तर ते त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले असते, पण तो अपयशी ठरला. पंतच्या दमदार फलंदाजीमुळे पहिल्या दिवशी भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला. अर्धशतकासाठी पंतला ७३ चेंडूंची गरज पडली, पण त्यानंतर त्याने २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या.
विराट कोहली आणि अय्यरला बाद करणाऱ्या ऐंबेलडुनियाला पंतने लक्ष्य केले. पंतने त्याच्या चेंडूंवर पुढे जाऊन जोरदार फटके मारले. त्यानंतर तो धनंजय डिसिल्वावर तुटून पडला. संधी मिळताच त्याने हवेत शॉट्स खेळण्यास सुरवात केली. पंतने श्रेयस अय्यरसोबत पाचव्या विकेटसाठी ८८ चेंडूत ५३ धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

पाचव्यांदा हुकले शतक
मोहाली कसोटीत बाद झाल्यानंतर खूप दुःखी झाला होता. पंत पाचव्यांदा नर्व्हस नाईन्टीचा बळी ठरला. ९० ते १०० धावांच्या दरम्यान तो आतापर्यंत पाच वेळा बाद झाला आहे. पंत दोनवेळा वेस्ट इंडिजविरुद्ध, एकदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध अशाच प्रकारे बाद झाला आहे. २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत ९२ धावांवर दोनवेळा (राजकोट आणि हैदराबाद) बाद झाला होता. २०२१ मध्ये सिडनी कसोटीत तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९७ धावांवर बाद झाला होता. तर गेल्यावर्षीच चेन्नई कसोटीत तो इंग्लंडविरुद्ध ९१ धावांवर बाद झाला होता. आताही मोहालीत श्रीलंकेविरुद्ध ९६ धावांवर असताना त्याला माघारी परतावे लागले. पंत ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, ती फलंदाजीची शैली जोखीमपूर्ण आहे आणि यामुळेच तो धोकादायक फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. पंतने पहिल्या ५० धावा ७३ चेंडूत पूर्ण केल्या, पण त्यानंतरच्या ४६ धावा करण्यासाठी त्याने फक्त २२ चेंडू खेळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here