थायलंड : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू शेर्न वॉर्न याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी शेन वॉर्न याने अखेरचा श्वास घेतला. जागतिक क्रिकेट गाजवणाऱ्या फिरकीपटूच्या अचानक झालेल्या निधनाने (Shane Warne Cricketer Passed Away) जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. थायलंडमध्ये वॉर्नचं निधन झालं असल्याचं त्याच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आजच्या दिवशी हा दुसरा धक्का बसला आहे. कारण आज सकाळीच माजी क्रिकेटपटू रोड मार्श याचंही निधन झालं होतं. आपल्या सहकाऱ्याच्या निधनानंतर शेन वॉर्न याने भावुक ट्वीट (Shane Warne Last Tweet) केलं होतं. रोड मार्शच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली वाहताना शेन वॉर्न याने मार्शने क्रिकेट विश्वाला दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला होता.

फिरकीचा महान जादूगार हरपला, शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

शेन वॉर्न हा आजही सोशल मीडियावर सक्रिय होता. वॉर्नने १२ तासांपूर्वीच केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, ‘रोड मार्शच्या निधनाचे वृत्त समजल्याने तीव्र दु:ख झालं आहे. या खेळातील तो महान खेळाडू होता आणि अनेक मुला-मुलींना तो प्रेरणा देत होता. क्रिकेटबाबत त्याला खूप काळजी होती. त्याने क्रिकेटला आणि खासकरून ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खूप काही दिलं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा,’ असं म्हणत वॉर्नने आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केलं होतं. मात्र या ट्वीटला १२ तास उलटण्याआधीच शेन वॉर्ननेही जगाचा निरोप घेतला आहे.

दरम्यान, शेन वॉर्न याचं निधन जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी खूप मोठा धक्का ठरला आहे. कारण आपल्या जादुई गोलंदाजीच्या बळावर वॉर्नने किक्रेट कारकीर्द गाजवली होती. शेन वॉर्नच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here