मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. पुणे बंड गार्डन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयाने काहीसा दिलासा दिला असतानाच त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी मंत्री आणि सध्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांचे फोन ‘टॅप’ केल्याच्या आरोपाखाली कुलाबा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन टॅपिंग प्रकरणातील त्यांच्यावरील हा तिसरा गुन्हा आहे.

सध्या केंद्रीय राखीव पोलिस दलामध्ये (सीआरपीएफ) प्रतिनियुक्तीवर असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्य गुप्तचर विभागात कार्यरत असताना त्यांनी कोणत्याही परवानगीविना विविध पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘फोन टॅपिंग’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारला सुपूर्द करण्यात आला. सरकारने अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुण्याच्या बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिला दिनी पर्यटक निवास आरक्षणात ५० टक्के सवलत, एमटीडीसीची विशेष योजना
काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा आरोप या गुन्ह्यात करण्यात आला होता. अशाच प्रकारे गुन्ह्याच्या तपासाचे कारण पुढे करून, टोपण नावे वापरून संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचेही फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर आहे.

दोन महिने फोन टॅपिंग

संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन जवळपास दोन महिने टॅपिंगसाठी लावण्यात आले होते. २०१९मध्ये दोघांचेही फोन टॅप करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ‘राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूने’ हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप गुन्ह्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे.

Weather Alert : येत्या ४ दिवसांत राज्यावर आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here