राज्यभरातील महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत राज्य निवडणूक आयोगातर्फे काढण्यात आली होती. या सोडतीत औरंगाबाद महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित असेल असे स्पष्ट झाले होते. महापालिकेत सत्तेचे दावेदार असलेल्या शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, एमआयएम या पक्षांनी महापौरपदाच्या या आरक्षणानुसार उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात न्यायालयीन प्रक्रियेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली. पालिका निवडणुकीबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (३ मार्च) निकाली काढल्यावर औरंगाबाद महापालिका निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आता महापौर कोण, अशी चर्चाही राजकीय गोटात सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाने काढलेल्या सोडतीत औरंगाबाद महापालिकेचे महापौरपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्यामुळे ओबीसी प्रवर्गातील वॉर्ड किंवा प्रभाग आता खुल्या प्रवर्गातील वॉर्ड किंवा प्रभाग म्हणून ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे औरंगाबादचे महापौरपदही खुल्या प्रवर्गातील महिलेसाठीच असेल असे तज्ज्ञांचे मत आहे. महापौरपदावर राजकीय पक्ष ओबीसी प्रवर्गातील महिलेची वर्णी लाऊ शकेल पण महापौरपदावर विराजमान होणारी महिला खुल्या प्रवर्गाची आहे असेच गृहीत धरले जाण्याची शक्यता आहे. पालिका निवडणूकीत निवडून आलेल्या ओबीसी प्रवर्गातील महिलेसह खुल्या प्रवर्गातील महिलेला देखील महापौर पदावर दावा करता येण्याची शक्यता आहे.