रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आज दहावा दिवस आहे. शनिवारी रशियाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलीय. रशियानं युक्रेनच्या मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांत तात्पुरत्या स्वरुपात सीझफायरची घोषणा केलीय. नागरिकांना शहरातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडोर उपलब्ध करून देण्याचं रशियाकडून सांगण्यात आलंय. रशियाच्या संरक्षण मंत्रालयातकडून याची पुष्टी करण्यात आलीय.
स्थानिक वेळेनुसार, १०.०० वाजता नागरिकांना सुरक्षितरित्या शहरांतून बाहेर पडण्यासाठी संबंधित दोन शहरांत सुरक्षित कॉरिडोर उपलब्ध करून दिला जाईल. या वेळेत रशियाकडून गोळीबार केला जाणार नाही, असं म्हणतानाच रशियानं युक्रेनियन नागरिकांना आपलं शहर सोडण्याचं आवाहन केलंय.
युक्रेनच्या मोक्याच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बंदर असलेल्या मारियुपोल शहराच्या महापौरांनी ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्यानं मारियुपोलची नाकाबंदी केली आहे.
वोलोदिमीर झेलेन्स्की कुठे आहेत? युक्रेनच्या माजी पंतप्रधानांनी केला खुलासा
सिंगापूरकडून रशियावर निर्बंध
दुसरीकडे, युक्रेनकडून रशियावर निर्बंध घालण्याचं आवाहन करण्यात आलंय. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी सिंगापूरच्या रशियन सेंट्रल बँक आणि इतर काही रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. सोबतच, युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यावरून रशियाला निर्यात होणाऱ्या वस्तूंवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
PayPal नं रशियातील सेवा केली बंद
युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करत डिजिटल पेमेंट कंपनी PayPal होल्डिंग्स इंकनं शनिवारी सकाळी रशियातील आपली सेवा निलंबित करण्याची घोषणा केलीय. त्याचसोबत, रशियावर निर्बंध घालणाऱ्या विविध आर्थिक आणि तंत्रज्ञान कंपन्यांत आता PayPal चाही समावेश झालाय. या अगोदर दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगसहीत अॅप्पल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांनीही रशियात आपल्या उत्पादनांची विक्री आणि सेवा रोखल्या आहेत.