इयत्ता बारावीच्या इंग्लिश विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक १ – A5 i या प्रश्नाबाबतची सूचना छापली गेली नव्हती. त्यामुळे या प्रश्नासाठी १ गुण देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांना एक गुण दिला जाणार आहे. ‘बोर्डाच्या अभ्यास समिती सदस्यांची आणि मुख्य पर्यवेक्षकांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत या विशिष्ट प्रश्नाबाबत निर्णय झाला आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक गुण देण्याचा निर्णय झाला,’ अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
दरम्यान, या पेपरमध्ये आणखीही काही चुका होत्या, असा विद्यार्थी शिक्षकांचा दावा आहे. बोर्डाने दिलेल्या सूचना आणि प्रश्नपत्रिका प्रशिक्षणानुसार व्याकरणाच्या प्रश्नांना पर्याय देण्यात आला नाही. मुलाखतीच्या प्रश्नासाठी टेबल आवश्यक असताना तो दिला नव्हता, ‘सिम्पल सेंटेन्स’ बनवा या प्रश्नासाठी देण्यात आलेले वाक्य मुळातच सिम्पल होते. प्रश्नाचे उत्तर असल्याने विद्यार्थी अक्षरश: चक्रावले. अपील लिहिण्याच्या सूचना अपूर्ण असल्याने त्या विद्यार्थ्यांना समजू शकल्या नाहीत, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे.