पुण्यात मोदींच्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांनी दिला भाजपला धक्का! – set back for bjp before pm narendra modi pune visit bjp leaders joins ncp rohit pawar
पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याची (Narendra Modi In Pune) शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपने विरोधकांवर कुरघोडी केल्याचंही बोललं जात आहे. मात्र अशातच कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी सायंकाळीच भाजपला पुन्हा एकदा धक्का दिला (Set Back To Bjp). कर्जतमधील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात आणि भाजपचे पदाधिकारी सुधीर राळेभात यांच्यासह जामखेड तालुक्यातील अनेक सोसायट्यांचे चेअरमन, सरपंच, सदस्य, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक म्हणून अमोल राळेभात यांची ओळख होती. राळेभात यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने आगामी जामखेड नगरपालिका निवडणुकीत भाजपला फटका बसेल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा : विरोधक आक्रमक; काँग्रेस-राष्ट्रवादीने केलं आंदोलन
कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज कोपनर यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ‘अजितदादांनी या सर्वांचं स्वागत करून पक्षात चांगलं काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या सर्व नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी केली जाईल,’ असं रोहित पवार यांनी या प्रवेश सोहळ्यावेळी म्हटलं आहे.
रोहित पवार यांचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राइक’
कर्जत जामखेडचे आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना अनेक मोठे धक्के दिले आहेत. भाजपचे विविध स्थानिक नेते राष्ट्रवादीमध्ये घेऊन भाजपला कमकुवत करण्याचं काम आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. याचाच परिणाम म्हणून कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर आता जामखेड नगरपालिका हे राष्ट्रवादीचे पुढील लक्ष्य असणार आहे आणि त्यादृष्टीनेच रोहित पवार यांनी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. जामखेडमधील भाजपचे आणखी काही बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस गळाला लावणार आहे, अशी चर्चा स्थानिक राजकारणामध्ये सुरू आहे.