करोनाची लक्षणे आढळल्याने या दोन्ही रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. या संशयितांचे स्वॅब कालच तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. परंतु, अद्याप तपासणी अहवाल प्राप्त झालेला नसल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करता येत नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात येत आहे. तसेच तपासणी अहवाल येण्याची वाट न पाहता त्याच्या संपर्कातील इतर लोकांचा शोध घेतला जात आहे.
जळगावमध्ये गुरुवारी दुपारी अडीच वाजता करोनाच पहिला बळी गेला होता. करोनामुळे मृत्यू झालेली वृद्ध व्यक्ती जळगाव शहरातील सालारनगर भागातील रहिवासी होती. त्यांचा फळे विक्रीचा व्यवसाय होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री त्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर आज सकाळपासून या वृद्धाची प्रकृती अधिकच खालावली होती. अखेर गुरुवारी दुपारी अडीच वाजता वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर हे दोन रुग्ण दगावले आहेत.
दरम्यान, राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६३५वर गेली आहे. तर राज्यात करोनाने आतापर्यंत ३२ जण दगावले असून ५२ लोकांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times