सुभाष टेकडी परिसरात नालंदा शाळेजवळील रस्त्यावर भटके कुत्रे टोळीने फिरत आहेत. कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतला. एकाच दिवशी लहान मुलांसह जवळपास १५ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिका प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. या समस्येवर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक भागांतून रात्रीच्या वेळी ये-जा करणे नागरिकांना अवघड झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडे सध्याच्या घडीला कोणतीही यंत्रणा नाही, असे सांगितले जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सुभाष टेकडी परिसरामधील अनेक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये काही लहान मुले आहेत. प्रशासनाशी आम्ही अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावर आम्हाला असे दिसून आले की, प्रशासन कोणतीही दखल घेत नसून महानगरपालिकेकडे कोणतीही यंत्रणा नसल्याचे दिसून आले आहे.