मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक पार्क करण्यावरून वाद झाला. त्यानंतर मंदार रवींद्र गुरव (वय २८), रवींद्र महादेव गुरव (वय ६८, दोघे राहणार धामणी ब्राम्हणवाडी) यांनी सदाशिव बाबुराव दौड (वय ७०) यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी दौड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना शनिवारी, ५ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.
तक्रारदार दौड आणि संशयित आरोपी रवींद्र आणि मंदार हे शेजारी राहतात. दौड यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या जमिनीच्या कारणावरून त्यांच्यात चार महिन्यांपासून वाद होता. या प्रकरणात संशयित आरोपी रवींद्र यांनी मालकी हक्काचा दावा देवरूख येथे दिवाणी कोर्टात दाखल केला आहे. हा खटला प्रलंबित आहे. दौड यांच्या मुलाच्या मालकीच्या धामणी येथील जागेत नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य भरलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. हा ट्रक वहिवाट असलेल्या ठिकाणी उभा होता. त्यावेळी ट्रक चालकाला मंदार याने जाब विचारला. ‘आमची वाहने येथून बाहेर काढायची आहे, तुम्ही इथे ट्रक उभा करू नका,’ असे मंदार म्हणाला. त्यावेळी चालक ट्रक बाजूला घेऊ लागला. मात्र, दहा-पंधरा मिनिटे झाली तरी, मंदारने वाहने बाहेर काढली नाहीत. त्यामुळे दौड यांनी चालकाला ट्रक पुन्हा होता त्याच ठिकाणी उभा करण्यास सांगितला. त्याचा राग आल्याने मंदार हा दौड यांच्या अंगावर धावून गेला. आरोपीने दौड यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या मारहाणीत त्यांच्या पायावर आणि पाठीवर दुखापत झाली. मंदारचे वडील रवींद्र यांनीही दौड यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक झावरे आणि पथक पुढील तपास करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times