मुंबई- छोट्या पडद्यावर प्रसारित होणारी ‘सुंदरा मनामध्ये भरली‘ मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत. खास करून मालिकेचा नायक अभिमन्यू आणि नायिका लतिका यांची जोडी सर्वांची आवडती आहे. लतिका आणि अभ्याच्या प्रेमात सुरुवातीपासून ‘मिस नाशिक‘ म्हणजे कामिनी मांजरासारखी आडवी येत होती. या दोघांना दूर करण्यासाठी कामिनीने अनेक कटकारस्थानं रचली. परंतु अभ्या आणि लतिकेने प्रत्येकवेळी ती हाणून पाडली. मात्र, अनेक दिवसांपासून मालिकेतून कामिनी हे पात्र गायब झालं होतं. आता हे पात्र पुन्हा एकदा मालिकेत आलं आहे. परंतु हे पात्र परत आणताना मालिकेच्या निर्माते, दिग्दर्शकांनी एक मोठी चूक केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

सुंदरा मनामध्ये भरली

नेमके काय घडले?

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत कामिनी ही खलनायिका दाखवली आहे. मालिका सुरू झाली तेव्हापासून ही भूमिका पूजा पुरंदरे साकारत होती. लतिका आणि अभ्याच्या प्रेमामध्ये कामिनी सतत येत होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात तिच्याबद्दल राग होता. मालिकेत काही दिवसांपासून कामिनी हे पात्र गायब झाले होते. मालिकेच्या कथानकात लेखकाने असे दाखवले की, दौलतने कामिनीचे अपहरण केले. कामिनीच्या अपहरणाचा ट्रॅक काही दिवस चालवण्यात आला. परंतु आता मालिकेत कामिनी पात्राचं पुनरागमन झालं. कामिनीची भूमिका आता श्वेता नाईक ही अभिनेत्री साकारत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली

मालिकेत जेव्हा कामिनी परत आल्याचे दाखवले तेव्हा प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. कारण मधल्या काळात कामिनीची भूमिका करणारी अभिनेत्री बदलली. त्याचा खुलासा लेखकाने दौलतच्या माध्यमातून केला. जेव्हा कामिनीच्या पात्राची एण्ट्री झाली तेव्हा दौलत तिच्यातील बदलाबद्दल विचारतो. तेव्हा कामिनी त्याला सांगते की, ती प्लास्टिक सर्जरी करून आली आहे. नेमकी हीच गोष्ट चाणाक्ष प्रेक्षकांना अजिबात पटलेली नाही.


सोशल मीडियावर मालिकेवर होतेय टीका

कामिनीने तिच्यात झालेल्या बदलामागे प्लास्टिक सर्जरी असल्याचे कारण दिले असले तरी प्रेक्षकांना हे अजिबात पटलेले नाही. सोशल मीडियावर या मालिकेवर टीकेची झोड उठली. एखाद्या व्यक्तीचा प्लास्टिक सर्जरीने चेहरा बदलता येतो. परंतु मालिकेत मात्र पूर्ण मुलगीच बदलल्याचे दाखवले आहे. प्रेक्षकांना वेडे समजणाऱ्या मालिकेचे लेखक, निर्माते यांच्यावर कडाडून टीका होत आहे. अनेक युझर्सनी याबद्दल तीव्र शब्दांत त्यांची नाराजी देखील व्यक्त केली आहे. एका युझरने लिहिले आहे की, ‘माझ्या अल्प आणि मंद बुद्धीला कृपया पटवून द्या की प्लास्टिक सर्जरी केल्यावर माणसाच्या चेहऱ्यासोबत माणसाचा आवाज, उंची, रुंदी सगळेच बदलते.’

सुंदरा मनामध्ये भरली

आणखी एका युझरने लिहिले आहे की, ‘सुंदरा आता मनातून उतरत चालील आहे.’

आणखी एका युझरने लिहिले आहे की, ‘सुंदरा मनातून कधीच उतरून गेली आहे. मी एक मालिका बघत होते. पण तिनेही माती खाल्ली. त्यांचे लग्न लावून, दौलत आणि आबांना जेलमध्ये टाकून मालिका बंद करायची. तर हेदेखील लागले रायत्यासारखे पसरायला आणि त्या कामिनीकडे प्लास्टिक सर्जरीसाठी पैसे आले कुठून..काही म्हणजे काहीही दाखवायचे.’ एकूण मालिकेचे निर्माते, लेखक प्रेक्षकांना कायम गृहित धरतात त्याबद्दल सोशल मीडियावर युझर्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here