महादेवाच्या मंदिरातील नंदी खरंच दूध पित होता?; खरं कारण आलं समोर! – important information given by the andhashraddha nirmoolan samiti regarding the rumor that the idol of nandi in mahadev’s temple is drinking milk
अहमदनगर : काही वर्षांपूर्वी गणपती दूध पित असल्याची अफवा राज्यात पसरली होती. त्याचीच आठवण करून देणारी आणखी एक अफवा नगर जिल्ह्यात पसरली. महादेवाच्या मंदिरातील नंदीची मूर्ती दूध पित असल्याची अफवा शनिवारी उत्तर नगर जिल्ह्यात पसरली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी भाविकांनी गर्दीही केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूल समितीने (Andhashraddha Nirmoolan Samiti) यामागील शास्त्रीय कारण सांगून या प्रकारावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
महादेवाच्या मंदिरातील नंदी दूध पित असल्याची अफवा श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सुरू झाली. त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी आणि शिर्डी परिसरातही ही अफवा पसरली. हा प्रकार पाहण्यासाठी ठिकठिकाणी भाविकांनी मंदिरात धाव घेतली. बेलापूरमध्ये शनिवारी सायंकाळी एक महिला मुंजोबा मंदिरामध्ये गेली होती. तेथे पूजा करताना महादेवाच्या पिंडीसोबत असलेला नंदी तिच्या हाताने दूध पित असल्याची अफवा पसरली. ते पाहण्यासाठी भाविकांनी धाव घेतली. जिल्ह्यात इतरही ठिकाणी ही घटना कळाली आणि त्यानंतर भाविक मंदिरात जाऊन नंदीच्या मूर्तीसमोर दूध धरून पाहून लागले. रात्री उशिरापर्यंत नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाविक असा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. पुणे मेट्रो : पहिल्या प्रवासासाठी तुफान गर्दी; मात्र तिकीट ॲपमध्ये तांत्रिक अडथळे
नेमकं काय आहे कारण?
अंनिसने यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. समितीतर्फे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं की, ‘नंदी दूध पितो, अशा प्रकारचा चमत्कार घडत असल्याची अफवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी पसरत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचे व्हिडिओही प्रसारित होत आहेत. खरंतर चमत्कार कधीही घडत नसतात. अशा घटनांच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम, हातचलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टी असतात. म्हणून नंदी दूध पितो, ही सुद्धा अफवाच आहे. या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे. अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे. म्हणून भाविकांनी आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहनही चांदगुडे यांनी केलं आहे.
दुसरीकडे, अंनिसच्या राज्य सचिव व बुवाबाजी संघर्ष समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. रंजना गवांदे यांनी नगर जिल्ह्यातील घटनांबद्दल सांगितलं की, ‘बेलापूर येथील नंदीची मूर्ती बरीच जुनी आहे. ती सच्छिद्र असल्याचं सोशल मीडियावरील व्हिडिओतून दिसते. सच्छिद्र दगड पाणी, दूध शोषून घेतो, ऊन, वारा यामुळे मूर्ती जीर्ण होते. त्यामुळे असे प्रकार घडतात. द्रवरूप पदार्थ काही प्रमाणत शोषला जात असल्याने मूर्ती दूध पित असल्याची अफवा पसरली असावी,’ असं अॅड. गवांदे यांनी सांगितलं आहे.