ठाणे: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्यावतीने प्रचंड उपाययोजना केल्या जात असतानाच काही विचित्र घटनाही घडताना दिसत आहेत. डोंबिवलीतील एका रुग्णालयातून एक क्वॉरंटाइन रुग्णच पळून गेल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबईसह ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातही करोनाच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून काही संशयितांवर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णालयात क्वॉरंटाइन असलेला एक रुग्ण शनिवारी रात्री रुग्णालयातून पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. करोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानं या व्यक्तीला क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. आता हा रुग्णच पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्यानेही हा रुग्ण पळून गेल्याची चर्चा आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या २४ पैकी पाचजणांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. यात डोंबिवलीतील ६० वर्षीय महिलेचाही समावेश आहे. तर, अजूनही १९ जण उपचार घेत आहेत. कल्‍याण-डोंबिवली महापालिकेने डोंबिवलीतील महापालिकेचे शास्‍त्रीनगर सामान्‍य रुग्‍णालय हे अलगीकरण रुग्‍णालय म्‍हणून घोषित केले असून १०० खाटांची या रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रातील संशयित रुग्‍णांना तिथे दाखल करून घेण्‍यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरित महापालिकेच्‍या रुग्‍णालयाशी संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी रुक्‍मिणीबाई रुग्‍णालय, कल्‍याण येथील ०२५१-२३१०७०० व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, येथील ०२५१-२४८१०७३ व ०२५१-२४९५३३८ या हेल्‍पलाइनवर संपर्क साधावा, असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here