राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल आणि त्यांचा मुलगा अमर आदियाल यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते.
शोभा आदियाल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आहेत. पिंपळेगुरवमधील सुदर्शननगर भागाचे २००७ ते १२ या काळात त्यांनी प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१७ च्या निवडणुकीत आदियाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांनी आपला मुलगा अमर आदियाल यांच्यासह रविवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.
अजित गव्हाणे यांची पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्यापासून त्यांनी भाजपचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही नगरसेवकांनी एकामागून एक राजीनामा दिल्यामुळे भाजपला गळती लागली आहे, असं चित्र शहरात निर्माण झालं होतं. परंतु आता राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकला पक्षात घेत भाजपने राष्ट्रवादीला शह दिला आहे.