देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये अटल बिहारी वाजपेयी उद्यानासह इतर विकासकामांचे उद्घाटन होणार होते. पिंपळे निलखमधील शहीद अशोक कामटे उद्यानाचे उद्घाटन करून देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पूर्णानगरच्या दिशेने निघाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णानगर येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानाचे काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप करत प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी एका व्यक्तीने थेट देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल भिरकावली.
पोलिसांकडून सौम्य लाठीमार
देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीकडून झालेल्या विरोधानंतर भाजपचेही कार्यकर्ते आक्रमक झाले. घटनास्थळी तणाव वाढला आणि भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या पार्श्वभूमीवर जमावाला पांगवण्याासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि परिसरात उपस्थित असलेल्या इतर नागरिकांचीही चांगलीच धावपळ उडाली.
निवडणुकीमुळे राजकीय संघर्ष वाढला
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष वाढीस लागला आहे. महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, तर आपला बालेकिल्ला पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळातही या दोन पक्षांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.