Pomegranate Farmers : सध्या राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण, डाळिंबावर पिन बोरर व होल बोरर या खोड किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी शेतकऱ्यांना चांगले तांत्रिक मार्गदर्शन करा. तसेच केंद्रीय पथकाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाठवा, अशा सुचना  खासदार डॉ. विकास महात्मे यांनी डाळिंब संशोधन केंद्रातील बैठकीत केली आहे.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये खोड किडीमुळे डाळिंब फळपीक संकटात आल्याने त्याबाबत संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांबरोबर बैठक झाली. या  बैठकीत डॉ. महात्मे बोलत होते. यावेळी केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्सना शर्मा, डॉ. मल्लीकार्जुन, डॉ. निलेश गायकवाड, मोर्फा चे संचालक हरिभाऊ यादव आदी उपस्थित होते. डाळिंबावर आलेल्या खोड किडीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे  केंद्राकडून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी शास्त्रज्ञांनी तसा रिपोर्ट देऊन मदत करावी अशी अपेक्षा मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी व्यक्त केली.


 
दरम्यान, मागील महिन्यात डॉ. विकास महात्मे व कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन राज्यातील डाळिंब उत्पादकावर आलेल्या संकटाबाबत सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर कृषीमंत्री तोमर यांनी तत्काळ केंद्रीय पथकाद्वारे पाहणी करुन रिपोर्ट सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून लवकरच सदर रिपोर्ट केंद्राकडे सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विकास महात्मे यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आले होते.
 
अनेक दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे हुकमी फळपिक हे डाळिंब आहे. पण खोड किडीच्या संकटाने डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना आधाराची गरज आहे. केंद्रीय पथकाचा रिपोर्ट केंद्राला सादर झाल्यानंतर परत केंद्रीय कृषीमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रय्तन करणार असल्याचे बैठकीत डॉ. महात्मे यांनी सांगितले.
    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here