मुंबई: भाजप आमदार रवी राणा यांचा संबंध नसतानाही राज्य सरकारने त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेकीचा घटना घडली तेव्हा रवी राणा दिल्लीत होते. तरीही पोलिसांनी रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर कलम ३०७ आणि कलम ३५३ सारख्या कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचं समर्थन अजिबात होणार नाही, ही घटना अत्यंत चूक आहे. पण गु्न्हेगाराशी संबंध नसताना शिक्षा दिली जातीय. उद्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही केलं मग अजितदादांना फासावर देणार का, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला. ते सोमवारी विधानसभेत बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली. रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना कोणत्या नेत्यांचे फोन गेले? रवी राणा यांच्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला. तर शाईफेक करणाऱ्यांवर तितके गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ३०७ चा गैरवापर सुरु आहे. अशाने पोलीस बेछूट होतील. आम्हाला गोंधळ करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. काही तरी आश्वासन द्या. विधानसभा सदस्यावर अन्याय झाला, काही तरी आश्वासन मिळालयला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस केली.
माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाकरे सरकारमधील नेत्याचा फोन, माझ्याकडे पुरावे आहेत: रवी राणा

रवी राणा सभागृहात प्रचंड आक्रमक

आमदार रवी राणा सोमवारी सभागृहात प्रचंड आक्रमक होताना दिसले. देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर विधानसभा अध्यक्षांनी रवी राणा यांना बोलण्यास परवानगी दिली. त्यावेळी रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. या दोघांनी फोन करूनच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. काही शिवभक्तांनी मनपा आयक्तांवर शाई फेकली, तेव्हा मी दिल्लीत होतो. मला बैठकीत असताना फोन आला आणि तुमच्यावर अमरावतीत ३०७ चा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात आलं. पोलीस आयुक्त सांगतात, सरकारमधल्या लोकांनी हा गुन्हा दाखल करायला लावला. यानंतर १०० ते १५० पोलीस घरी गेले, वृद्ध आई होते, घरात घुसून तपासणी केली. खासदारांचाही अपमान करण्यात आला. या राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी आयुक्तांना फोन केला आणि गुन्हा दाखल करायला लावला. रवी राणांना अटक करायचे आदेश दिले, असे रवी राणा यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here