सोलापूर : शेतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने राज्यभरात शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातही सर्वत्र महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोलापूरमध्ये सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने (Solapur Shivsena) यांनीच विरोधाची भूमिका घेतली असून माने यांनी शेकडो शेतकऱ्यांसह महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. (Farm Power Supply)

गेल्या आठ दिवसांपासून वीज वितरण कंपनीने शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गाव-खेड्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसंच शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेली शेतातील उभी पिके जळून जात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत सापडला असून राज्य सरकार आणि महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

‘त्या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?; काँग्रेसचा सवाल

करोना काळात आर्थिक स्थिती खालावलेली असतानाही बहुतांश शेतकरी वीज बिल भरण्यासाठी तयार आहेत. मात्र वीज वितरण कंपनीकडून तडजोड न करता अव्वाच्या सव्वा रक्कम भरायला सांगितली जात आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय शेतीपंपाची कागदोपत्री क्षमता वाढवली आहे. त्यामुळे अनेकांना एक लाख रुपयांहून अधिकची वीजबिले येत आहेत.

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी मेटाकुटीला आला असून आता शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेतेही आंदोलनाची भूमिका घेऊ लागले असून यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here