Uttarakhand Exit Poll देहरादून : उत्तराखंडमध्ये कुणाचं सरकार येईल, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विशेष म्हणजे इथे नेहमीच विशेष कल दिसून आला आहे. या राज्यात प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्ताबदल झाला आहे. मागील निवडणुकीत भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवून सरकार स्थापन केलं होतं. भाजप हा ‘कल’ बदलणार का? किंवा सत्ताबदल होईल का? किंवा यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळेल, अशी जोरदार चर्चा आहे. त्यात पहिल्यांदाच आम आदमी पक्षानं आव्हान उभं केलं आहे. उत्तराखंड निवडणुकीचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी एक्झिट पोलचा अंदाज प्रसिद्ध झाला आहे. यावेळी कुणाचं सरकार येईल? भाजप सत्ता राखणार का ? याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या आकड्यांवर एक नजर…
उत्तराखंडमध्ये २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता. भाजपने राज्यातील ७० विधानसभा जागांपैकी ५६ जागांवर विजय मिळवला होता. राज्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात भाजपचा हा सर्वात मोठा विजय होता. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतका मोठा विजय मिळवला नाही. त्यावेळी राज्यात मोदी लाट होती. सत्ताधारी काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळले होते. मुख्यमंत्री हरिश रावत यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्र्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसला केवळ ११ जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्ष विजयी झाले होते.