इंफाळ : मणिपूरमधील विधानसभा निवडणुकीचे (Manipur Assembly Election 2022) मतदान दोन टप्प्यांत पार पडले. १० मार्च रोजी मणिपूर विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होणार आहे. या राज्यात कुणाची सत्ता येणार, पुन्हा भाजप सरकार येणार का? याची चर्चा आहे. २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत या राज्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी अन्य पक्षांच्या मदतीने भाजपने मणिपूरमध्ये सत्ता स्थापन केली होती. झी न्यूज आणि इंडिया टुडे-अॅक्सिसच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचा अंदाज आहे. तर जन की बात आणि एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
झी न्यूज एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत झी न्यूजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला मणिपूरमध्ये बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला ३२ ते ३८ जागा मिळू शकतात. तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला १२ ते १७ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. इंडिया न्यूज-जन की बात यांच्या एक्झिट पोलनुसार, मणिपूर विधानसभेच्या ६० पैकी २३ ते २८ जागांवर भाजपला विजय मिळू शकतो. तर काँग्रेसला १० ते १४ जागांवर विजय मिळेल. याशिवाय नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ५ ते ८ जागांवर विजयी होऊ शकतो. तर एनपीपीला ७ ते ८ जागा मिळतील असा अंदाज आहे. अन्य पक्षांना ८ ते ९ जागा मिळतील.