लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या नातेवाईकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढे याने या तरुणाकडे ३७ लाख रुपयांची मागणी केली. यातील पाच लाख स्वतःसाठी, दोन लाख वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसाठी आणि ३० लाख तक्रारदार तरुणीला देण्यात येतील, असे मुंढे याने या तरुणाला सांगितले. इतकी मोठी रक्कम आणणार कुठून? असा प्रश्न पडल्याने या तरुणाने मुंढे याला होकार देतानाच त्यांच्या विरोधात एसीबीच्या वरळी येथील कार्यालयात लेखी तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने या तरुणाने दिलेल्या तक्रारीची शहानिशा केली आणि त्यानुसार सोमवारी सापळा रचला. या तरुणाकडून सात लाख रुपये घेताना भरत मुंढे याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले. मुंढे याच्याविरोधात एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.