मुंबई-द काश्मिर फाइल्स‘ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली असून कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करणार नसल्याचं सांगितलं. असं करण्यामागचं कारणही त्यांनी यावेळी सांगितलं. या सिनेमात कोणतेही मोठे स्टार नसल्यामुळे कपिलने चित्रपटाच्या टीमला आमंत्रित करण्यास नकार दिल्याचं विवेक यांनी सांगितलं.

द कपिल शर्मा शो‘ मध्ये चित्रपटाचं प्रमोशन व्हायला हवे असे ट्वीट युझरने सोशल मीडियावर केल्यानंतर विवेक यांनी ही पोस्ट केली. युझरने कपिल शर्मासाठी असेही लिहिले की, ‘कपिल, तू सगळ्यांनाच मदत केलीस, कृपया या सिनेमाचंही प्रमोशन कर.’

युझरला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, ‘कपिलच्या शोमध्ये कोणाला आमंत्रित करावं हे मी ठरवू शकत नाही. त्यांनी कोणाला आमंत्रित करावं ही त्याची आणि निर्मात्याची इच्छा आहे. जोपर्यंत बॉलीवूडचा संबंध आहे, मिस्टर बच्चन यांनी गांधी घराण्याबद्दल जे म्हटले तेच मी म्हणेन. तो राजा आहे, आम्ही रंक आहोत.’

या ट्वीटनंतर ‘द कपिल शर्मा शो’ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. काही युझर्सनी असेही म्हटलं की, काश्मिरी हिंदूंवर झालेले अत्याचार आणि त्या मागचं सत्य समोर येईल म्हणून कपिल शर्माची टीम ‘द काश्मिर फाइल्स’ च्या टीमला बोलवत नाही. अलिकडेच विवेक यांनी यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आणि बॉलिवूडच्या एका टोळीविरुद्ध काही गोष्टी शेअर केल्या होत्या.

विवेक अग्नीहोत्री

विवेक यांनी लेखिका, पत्रकार आणि विधू विनोद चोप्रा यांची पत्नी अनुपमा चोप्रा यांच्यावरही नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, अनुपमा यांनी जाणीवपूर्वक बॉलिवूड चित्रपटांचं प्रमोशन केल्या जाणाऱ्या त्यांच्या पेजवर ‘काश्मिर फाइल्स’चं प्रमोशन केलं नव्हतं.

विवेक अग्निहोत्रींनी याबाबत ट्वीट करत अनुपमा यांच्यासाठी ‘बॉलिवूडची शूर्पनखा’ हा शब्द वापरला होता आणि त्यांना आव्हान देताना लिहिलं होतं की, ‘तुमच्यात हिंमत असेल तर ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाची उघडपणे निंदा करा. पण पाठीमागून गलिच्छ खेळ खेळणं थांबवा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here