विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मलिक आणि दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित व्यवहार सविस्तरपणे सांगितले. मुंबईकरांच्या मारेकऱ्यांसोबत व्यवहार का केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या व्यवहार आणि मालमत्तेतून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला. हसीना पारकरसोबत हा व्यवहार झाला असून, एका ट्रॅव्हल एजंटच्या कार्यालयात हा सगळा व्यवहार झाला आहे. त्यानेही हे मान्य केले आहे, असेही ते म्हणाले.
हिंमत होते कशी?
या राज्याच्या मंत्र्यांची मुंबईच्या गुन्हेगारांशी अशा प्रकारचा व्यवहार करण्याची हिंमत होतेच कशी, असा सवाल फडणवीस यांनी यावेळी केला. जमिनीच्या मालकाला एकही पैसा मिळालेला नाही. त्यांनी स्वतः तसे सांगितले आहे. हा सर्व पैसा हसीना पारकर आणि सलीम पटेल, शाहवली खान याला मिळाला. देशाच्या शत्रूला काळा पैसा मिळाल्यानंतर तो काय या देशाचं भलं करणार आहे का? असाही सवाल त्यांनी केला.
मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी स्पर्धा लागली नाही
या सरकारमधील मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठी स्पर्धा लागलेली नाही. मी विरोधी पक्षनेता झाल्यापासून एकाही मंत्र्याचा राजीनामा मागितला नाही. इतकंच काय तर, मी मुख्यमंत्र्यांचाही राजीनामा कधी मागितला नाही. पण थेट आरोप हे मंत्र्यांवर होत असतील तर काय करणार, असेही फडणवीस म्हणाले. राजीनामा घेतला तर, विरोधकांचा विजय होईल असे वाटते. पण हा विजय देशातील, महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेचा असेल. ज्याचा संबंध या देशाच्या शत्रूशी आला असेल तर, त्या नेत्याला सभागृहात बसण्याचा अधिकार आहे काय? असाही सवाल फडणवीस यांनी केला. मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर, हे सरकार कोणाला संरक्षण देत आहे? कुणाला पाठिंबा देत आहे? असे प्रश्न उपस्थित करतानाच, एका शांतपणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नेत्यांनी याचा विचार करावा, असेही फडणवीस म्हणाले. उद्या मुंबई असुरक्षित झाली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल. राज्य सरकार म्हणून तुमची इच्छाशक्ती आहे का? एकत्रितपणे यावर काही निर्णय घेणार आहात का? अशी प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी यावेळी केली.