मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavan) यांच्या कार्यालयातील १२५ तासांचे व्हीडिओ फुटेज सादर केले होते. या व्हीडिओजच्या आधारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र, शरद पवार यांनी या सगळ्यासंदर्भात एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात जाऊन १२५ तासांचे रेकॉर्डिंग करण्यात यश मिळवल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक करतो. पण १२५ तासांचं रेकॉर्डिंग करण्याची प्रकिया किती दिवस सुरु असेल, हे लक्षात घेतले पाहिजे. अशाप्रकारचे रेकॉर्डिंग शक्तिशाली यंत्रणाच करू शकतात. सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडेच अशा यंत्रणा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
Pravin Chavan: देवेंद्र फडणवीसांच्या खळबळजनक आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
तसेच प्रवीण चव्हाण यांच्या वक्तव्यांचा दाखला देत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप शरद पवार यांनी फेटाळून लावले. या व्हीडिओत माझं नाव घेतले गेले आहे. पण माझं असं कोणतंही बोलणं झालेलं नाही. मी केवळ देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या एका सहाकाऱ्यासंदर्भात बोलण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी मी तुमच्या सहकाऱ्यावर गंभीर आरोप असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, ‘मी या प्रकरणात लक्ष घातले आहे, पुन्हा असा प्रकार घडणार नाही’, इतकेच मला कळवण्यात आले. याशिवाय, या प्रकरणाशी व्यक्तिश: माझा काहीही संबंध नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मोठ्या साहेबांची सगळीकडे नजर असेल, पण आता शंकराचा तिसरा डोळाही उघडलाय; भाजपचं सूचक ट्विट
तसेच शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे असल्याच्या आरोपालाही शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. राजकारणात कोणी कोणाला संपवत नसते. राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्पर्धा असते पण सत्तेचा गैरवापर केला जात नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

‘नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही’

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. ते गेल्या २५ ते ३० वर्षांपासून विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. मग आत्ताच त्यांच्यावर आरोप का होत आहेत? कोणत्याही मुस्लीम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायच, हा प्रकार घृणास्पद असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here