रशियानं केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेन एकाकी पडल्यानंतरही बलाढ्य शत्रुला रोखून धरण्यात यशस्वी ठरलाय. गेल्या १३ दिवसांपासून सुरु असलेल्या रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनचे अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागलेत तर दुसरीकडे रशियाचंही मोठं नुकसान झालंय. याच दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मंगळवारी ब्रिटश संसदेला युक्रेनला मदतीचा हात देण्याचं आवाहन केलं. यावेळी, झेलेन्स्की यांनी रशियाला ‘दहशतवादी देश‘ म्हणून घोषित करण्यात यावं, अशी मागणी ब्रिटिश संसदेसमोर केली. सोबतच, ‘आपलं आकाश सुरक्षित राहण्यासाठी’ रशियावर कडक निर्बंध लागू केले जावेत, असंही त्यांनी म्हटलंय.
४४ वर्षीय युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून ‘हाऊस ऑफ कॉमन्स‘ला संबोधित केलं. यावेळी, आपल्या भाषणात झेलेन्स्की यांनी माजी ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि प्रसिद्ध कवि-लेखक शेक्सपिअर यांचाही उल्लेख केला. १९४० मध्ये दुसऱ्या विश्वयुद्धा दरम्यान विन्स्टन चर्चिल यांचं ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये दिलेलं भाषण अत्यंत प्रभावी भाषणांपैंकी एक ठरलं होतं.
‘बोरीस, मी तुमचा आभारी आहे. पश्चिमी देशांच्या मदतीसाठी आम्हाला तुमची मदत हवीय’ असं झेलेन्स्की यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना संबोधित करताना म्हटलं.
‘आम्ही शत्रुसमोर गुडघे टेकणार नाही आणि आम्ही पराभूतही होणार नाही. आम्ही आमच्या देशासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू’ असंही झेलेन्स्की यांनी ब्रिटिश संसदेसमोर म्हटलं.
झेलेन्स्की यांचं हे भाषण अत्यंत प्रभावी आणि भावूक ठरलं. यावर, ब्रिटिश संसदेनं युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांच्या या जिद्दीला ‘स्टँडिंग ओवेशन’ देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.
ब्रिटिश संसदेसमोर पहिल्यांदाच एखाद्या परदेशी नेत्यानं ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या खासदारांना थेट संबोधित केलं. यानंतर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि चेक गणराज्य या देशाच्या नेत्यांसोबत युक्रेन संकटाच्या मुद्यावर चर्चा केली.