पेट्रोलच्या दरवाढीसोबत आता पेट्रोलच्या टंचाईचाही धोका निर्माण झालेला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. यात रशियाकडून इंधनाच्या खरेदीचा व्यवहारही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अन्य पुरवठादार देशांकडून खनिज तेलाची मागणी वाढू शकते. ही मागणी वाढल्यानंतर वाढीव दरात अपेक्षित तेलसाठा मिळेल का, अशी शंका आहे. त्यामुळे आगामी काळात औरंगाबाद सह अन्य शहरांमध्ये पेट्रोल टंचाई निर्माण होण्याचा धोका अधिक असल्याचे संकेत पेट्रोल असोसिएशनकडून दिले जात आहे.
शहराची मागणी चार लाख लिटरपर्यंत
औरंगाबाद शहरात काही वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याशिवाय पेट्रोल पंपाचीही संख्या वाढलेली आहे. सध्या औरंगाबाद शहरातच पेट्रोल पंपाची संख्या ७५पेक्षा जास्त झाली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने सध्या औरंगाबादला चार लाख लिटर पेट्रोलचा दररोज पुरवठा करण्यात येत आहे. तसेच डिझेलचीही विक्री साडे तीनलाख लिटर पेक्षा पुढे पोहोचलेली आहे.
इराण-इराक युद्धावेळी झाले होते रेशनिंग
याआधी १९८०च्या दशकामध्ये इराण आणि इराक या दोन देशांत युद्ध पेटले होते. या युद्धानंतर अचानक जगात पेट्रोल टंचाई निर्माण झालेली होती. या युद्धावेळी पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल आणि डिझेलचा निश्चित कोटा देण्यात येत होता. सध्या रशियाकडून युरोपीय देशांना इंधनाचा पुरवठा होता. त्यामुळे, रशियावरील निर्बंधांनंतर जगामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सध्या शहरातील सर्वच पंपावर पेट्रोलची विक्री वाढलेली आहे. या काळात इंधनाची मागणीही वाढत असते. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल टंचाईचा धोका आहे. मात्र तो होईल किंवा नाही हे आताच सांगता येत नाही.