याबाबत प्रसारमाध्यमांशी आशिष शेलार यांनी संवाद साधला. ‘हा महाभयंकर कट असून, विरोधी पक्षनेते ‘देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पुराव्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा वापर, पोलीस यंत्रणाचा गैरवापर या सर्व बाबींचे धागेदोरे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा कट देखील उलगडला आहे. एकूण पाहता हा महाभयंकर कट दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
सरकारी वकिलांची देखील सुरक्षा वाढवावी
देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे ज्या कटाबद्दल होते. त्या कटाचा मास्टरमाइंड विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आहेत. त्यामुळे विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्याशी कोणाच्या गाठीभेटी होत आहेत. कोणत्या व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अथवा घरी जात आहेत? यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या कटाचे मास्टरमाइंड चव्हाण असल्याने त्यांचीही सुरक्षा महत्त्वाची असून राज्य सरकारने विशेष सरकारी वकील यांना देखील अधिक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी शेलार यांनी यावेळी केली.
ईडी आणि सीडी दोन्ही लावलं; एकट्या फडणवीसांनी तीनही पक्षांना घाम फोडला
‘अजून पुढचे बरेच अंक बाकी’
‘लाव रे तो व्हिडिओ’ काय असतो, ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दाखवून दिले. सरकारच्या भयंकर कटाचे वगनाट्य उघड करून ठाकरे सरकारचे त्यांनी ‘वस्त्रहरण’ केले. नाटकातील “तात्या सरपंच” कोण? मंजुळाबाई कोण? गोप्या कोण? मास्तर कोण? अजून पुढचे बरेच अंक बाकी आहेत, असे खोचक ट्विट करून आमदार शेलार यांनी सरकारवर टीका केली.