रवी राऊत/यवतमाळ : एकेकाळी जिल्ह्याला समृद्ध गोधनाचा वारसा होता. मागील काही काळात पाणी, चाराटंचाई आणि इतर अडचणींमुळे गोधनात कमालीची घट झाली. ग्रामीण जनजीवन आणि शेती समृद्ध करणारा गोधनाचा सेतू यामुळे खंडित झाला. परंतु आता पुन्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांनी गोधनातून समृद्धीचा मार्ग दाखवत धवलक्रांती कडून समृद्धीकडे जाण्याचा आदर्श ठेवला आहे.

जिल्ह्यातील नेर तालुक्यामधील चिकणी डोंमगा येथील प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी तथा जिल्हा परिषद सदस्य यांनी गावात धवलक्रांतीची बीजे रोवली. तसं चिकणी हे गाव अवर्षणग्रस्त आहे. काही वर्षाआधी येथे पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या होती. शेतीत सिंचनाचा टक्का हा शून्य होता. गावात असलेल्या गाई म्हशी पशुपालकांनी परवडत नसल्यामुळे विकून टाकल्या होत्या. अशा या कठीण प्रसंगात निखिल जैत यांनी दुधाळ गाई जोपासण्याचा कठीण आणि जोखमीचा मार्ग अवलंब करत त्यात यश संपादन केले.

त्यांनी आपल्या शेतात बंदिस्त सुरु केले आहे. त्यांच्याकडे सध्या होस्टन आणि जर्शी गाई आहेत. दोन गाईपासून त्यांनी सुरुवात केली. अडीच वर्षात आता त्यांच्याकडे लहान मोठ्या २३ गाई आहेत. यातून दररोज सध्या १२० लिटर दुधाचे उत्पादन होते. यातील १०० लिटर ते विक्री करतात तर उर्वरित वीस लिटर गाईच्या वासरांसाठी ठेवतात. यातील ४ गाई त्यांनी हरियाणा येथून तर ३ गाई सांगली येथून आणल्या आहेत. पोस्टर गाईपासून १२ ते २३ लिटर तर, जर्शी पासून १० ते १५ लिटर दूध उत्पादन होते. या गोपालनाथ त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करत मिल्किंग मशीन, चारा कुट्टी आदी बाबींचा अवलंब केला आहे.

पाण्यासाठी त्यांनी दोन ते अडीच एकर जमिनीवर नेफीयर, मार्वेल, लसूणघास लावला असून गाईंना हा पौष्टिक चारा दिला जातो. या वर्षी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर हजार किलोग्रामच्या दोन बॅगमध्ये मुरघासही तयार केले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे गावातील नागरिकांमध्ये या विषयाची नकारात्मकता जाऊन सकारात्मक दृष्टिकोनाची पेरणी झाली. ज्या गावात शून्य लिटर दूध उत्पादन व्हायचे ते गाव आता दुग्धव्यवसायाचा हब होण्याच्या मार्गावर आहे.

गावकऱ्यांनी जैत यांचं अनुकरण करत गाई-म्हशींचा सांभाळ करणे सुरू केले आहे. सध्या गावामध्ये ३५ लोकांकडे गाई आहेत. यातून १५० लिटर दूध रोज संकलित केले जाते. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे दररोज पैसा येत असून शेतीच्या कामासाठी पैशाची चणचण दूर झाली आहे. याचा थेट परिणाम शेती उत्पादनावरही झाला आहे. खिशात पैसे असल्यामुळे वेळेत शेतीच्या खत आणि फवाऱ्यांची तजवीज या माध्यमातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here