विधीमंडळ आवारात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ‘भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचे काम करत आहे. कुठलातरी कायदा पुढे करून न्यायालयात याचिका दाखल करायची; परंतु त्यांच्या या प्रवृत्तीला उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून मोठी चपराक दिली आहे. १२ लाख रुपयेही जप्त केले आहेत, असे नाना पटोले म्हणाले. भाजपने आतातरी लोकशाहीची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जाणीवपूर्वक कोर्टात जायचे आणि चांगले काम सुरू आहे त्याला कोर्टात आव्हान देण्याचे काम भाजपने बंद करावे. राज्यपाल महोदयांना माझी विनंती आहे की, त्यांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही पटोले म्हणाले.
राज्याचा अर्थसंकल्प ११ तारखेला सादर केला जाणार आहे. त्याआधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी, अशी आमची इच्छा आहे. अशोक चव्हाण, अनिल परब, अजित पवार यांनी राज्यपालांची काल भेटही घेतली आहे. अर्थसंकल्पाच्या आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडावी आणि राज्यपाल त्यादृष्टीने निर्णय घेतील, असा आमचा विश्वास आहे, असे पटोले म्हणाले.