ही बॅग एका लष्करी कर्मचाऱ्याची असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. तसंच सदर लष्करी कर्मचारी काही अंतरावर मद्यपान करून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. तपासणीनंतर रेड सिग्नल मिळाल्याने या बॅगमध्ये नेमकं काय आढळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
नेमकं काय घडलं?
बुधवारी सायंकाळी ही बॅग स्वस्तिक बस स्थानकाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर उड्डाणपुलाखाली आढळून आली. याची माहिती मिळाल्यावर बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने बॅगेमध्ये बॉम्बसदृश्य काही वस्तू आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्यांचे गॅजेट लावले. त्यावर बॅगमधून रेड अलर्ट मिळाला. त्यामुळे आतमध्ये स्फोटक वस्तू असल्याचे संकेत मिळाले होते. या प्रकारानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांनी तात्काळ नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक वळवली आणि या महामार्गाची एक बाजू मोकळी करण्यात आली होती.
दरम्यान, ही बॅग पोलिसांनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नेऊन उघडली. बॅगेत काहीही स्फोटके किंवा धोकादायक आढळून आले नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.