ठाणे: झटपट पैसा कमावून मौजमजा करण्यासाठी सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन तरुणांना कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोन तरुणांकडून कळवा पोलिसांनी ४ गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक नवीन दुचाकी असा एकूण २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ठाण्यातील कळवा येथील पारसिक नगर परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिला सुनंदा चासकर या ५ जानेवारी रोजी रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे आणि ३० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र व माळ हिसकावून पोबारा केला. या वृद्ध महिलेने याबाबत ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू केला. यावेळी पोलिसांकडे कुठलाही पुरावा नसल्याने पोलिसांनी तांत्रिक यंत्रणा आणि गुप्त खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना कळवा पूर्व येथे पॅट्रोलिंग करत असताना, दुचाकीवरून दोन तरूण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले.

Dombivli Crime news : चोरीचे दागिने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात ‘असा’ अडकला
Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, एकाच दिवशी १५ जणांना चावा

पोलिसांनी त्या दोघांना हटकले असता, त्या दोघांनी तेथून पळ काढला. पोलिसांचा संशय वाढल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच, त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. या दोघांनी आणखी ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

Dombivli crime news : वाद इतका टोकाला गेला की ‘त्याला’ खाली पडेपर्यंत मारले

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी असा तब्बल २ लाख रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता, या दोघांनी सोनसाखळी चोरीचा मार्ग झटपट पैसे कमावून मौजमजा करण्यासाठी पत्करला असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्या दोघांना ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात आणखी कोण साथीदार आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here