देशात सर्वाधिक म्हणजेच एकूण ४०३ विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशावर भाजपनं पुन्हा एकदा ताबा मिळवल्याचं आता स्पष्ट होतंय. त्याचसोबत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा उत्तरप्रदेशचं मुख्यमंत्री पद मिळण्याचा मार्गही मोकळा झालाय. यानंतर उत्तर प्रदेशनं एक ‘नवा इतिहास’ रचल्याची प्रतिक्रिया भाजपकडून व्यक्त करण्यात आलीय. गोरखपूरचे भाजप खासदार रविशंकर किशन यांनी आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये या पक्षाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.
‘ना सायकल, ना हाथी, ना हाथ बा… उत्तर प्रदेश में योगी आदित्यनाथ बा’ असं भोजपुरी स्टाईलनं म्हणत रविशंकर किशन यांनी आपल्या पक्षाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच या विजयाचं श्रेय त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलंय.
तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सुशासन मॉडल’चा हा विजय असल्याचंही म्हणत विजयाचं श्रेय मोदींना देण्यात आलंय. जनतेनं पंतप्रधान मोदींच्या धोरणावर विश्वास दाखवल्याचं भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटलंय.
भाजपची जोरदार सेलिब्रेशनची तयारी
भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना बघून पक्षाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार सेलिब्रेशनची तयारी सुरू केलीय.
भाजपचे अनेक कार्यकर्ते बुलडोझरसहीत रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही दुपारी २.०० वाजेपर्यंत लखनऊ स्थित भाजप कार्यालयात दाखल होणार आहेत.
उत्तर प्रदेशातील एकूण ४०३ जागांपैंकी कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २०२ जागा मिळवणं गरजेचं होतं. सध्याच्या घडीला भाजप २५१ जागांवर आघाडीवर असल्यानं भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचं दिसून येतंय. निकालात समाजवादी पक्ष १२१ तर बहुजन समाज पक्ष २ तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर असल्याचं दिसतंय.