उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये एकूण ४०३ जागांपैंकी कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २०२ जागा मिळवणं गरजेचं होतं. सध्याच्या घडीला जवळपास २५० जागांसहीत भाजपनं राज्यात स्पष्ट आघाडी घेतल्याचं हाती आलेले कल सांगत आहेत. तर समाजवादी पक्ष १२४ तर बहुजन समाज पक्ष २ तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर असल्याचं हे दिसून येतंय. यामुळे, उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपच सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना अनेक सोई-सुविधा आणि योजना ‘मोफत’ देण्याचं आश्वासन दिलं होतं. या वचनांची पूर्तता करणं आता पक्षासाठी गरजेचं ठरणार आहे. त्यासाठी भाजपला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची संधी देणाऱ्या नागरिकांनी पक्षाच्या जाहीरनाम्यातील घोषणांची पुन्हा एकदा उजळणी करणंही गरजेचं आहे.
शेतकऱ्यांना ‘मोफत’ वीज
भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना दिलेल्या मोठ्या वचनात पुढच्या पाच वर्षांपर्यंत सिंचनासाठी मोफत वीज पुरवण्याचं वचन दिलंय. तसंच सत्तेत आल्यास उसाचे पैसे १४ दिवसांत शेतकऱ्यांना मिळतील. यात उशीर झाल्यास शेतकऱ्यांना या पैशांवर व्याजही दिलं जाईल, असं आश्वासन भाजपनं दिलंय.
पेन्शन वाढ
राज्यातील विधवा आणि निराधार महिलांना मिळणारं पेन्शन १५०० रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या महिलांना दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळतेय.
गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत
मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेंतर्गत आर्थिक मदत १५ हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात येणार आहे. तसंच मुख्यमंत्री सामूहिक विवाह अनुदान योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
मोफत सिलेंडर
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना होळी आणि दीपावलीच्या दिवसांत दोन एलपीजी सिलिंडर ‘मोफत’ दिले जाणार आहेत.
महिलांना मोफत प्रवास
६० वर्षांवरील सर्व महिलांना राज्यातील सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे.
विद्यार्थिनींना मोफत स्कूटर
राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत महाविद्यालयीन गुणवंत विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत स्कूटी देण्याचं आश्वासनही भाजपकडून देण्यात आलंय.
रोजगाराची व्यवस्था
पाच वर्षात ३ कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचा दावा करताना भाजपनं पुढच्या पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबात किमान एका व्यक्तीला रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी देण्याचं आश्वासन दिलंय.
मोफत प्रशिक्षण
अभ्युदय योजनेंतर्गत UPSC, UPPSC, NDA, CDS, JEE, NIIT, TET, CLAT आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या तरुणांना मोफत कोचिंग सुविधा दिली जाणार आहे.
स्मार्टफोन आणि टॅबलेट
स्वामी विवेकानंद युवा शक्तीकरण योजनेंतर्गत दोन कोटी टॅबलेट आणि स्मार्टफोनचं वाटप करण्याचं वचनही भाजपनं दिलंय.