अमृतसर- यावेळी आम आदमी पक्षाचे वादळ पंजाबमध्ये धडकले असून पंजाब विधानसभा निवडणुकीवर त्यांनी आपली पकड भक्कम केली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव होताना दिसत आहे. आता पंजाबमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारतील हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. भगवंत यांच्यासोबतच संपूर्ण पंजाबमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. आज भलेही भगवंत राजकारणाच्या दुनियेत रमले असले तरी याआधी त्यांनी आपल्या विनोदबुद्धीने लोकांची मनं जिंकली आहेत.

भगवंत मान यांचा जन्म पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सातोज गावात झाला. त्यांना पहिल्यापासून कॉमेडीची आवड होती आणि या छंदाने भगवंत मान यांना स्टँड-अप कॉमेडीच्या विश्वात आणले. भगवंत मान यांनी आपल्या कॉमेडीमध्ये भारतीय राजकारणापासून ते क्रीडा, महागाई, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींवर भाष्य केलं. तेव्हा एक दिवस तेही राजकारणात अडकतील असं वाटलं नव्हतं. एकेकाळी माईकच्या मागे राहून लोकांना हसवणारे भगवंत मान आता त्याच माईकच्या मागे उभे राहून पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथही घेतील.

भगवंत मान यांनी महाविद्यालयीन जीवनापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ९० च्या दशकात त्यांनी आपल्या कॉमेडी आणि विडंबन व्हिडिओंद्वारे लोकांचं खूप मनोरंजन केलं. त्यानंतर भगवंत यांनी पंजाब विद्यापीठातील एका स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यात त्यांनी दोन सुवर्णपदकं जिंकली होती.

पहिला अल्बम

भगवंत मान यांचा पहिला कॉमेडी अल्बम जगतार जग्गीसोबत आला होता. दोघांची जुगलबंदी चांगलीच गाजली होती. मात्र १० वर्षांनंतर भगवंत मान आणि जगतार यांची जोडी तुटली. त्यानंतर भगवंत मान यांनी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पण २००६ मध्ये भगवंत आणि जगतार पुन्हा एकदा एकत्र आले होते. त्यांचा ‘नो लाइफ विथ वाईफ’ हा शो खूप गाजला होता.

पण भगवंत मान यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारा कॉमेडी शो म्हणजे ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेन्ज.’ २००८ मध्ये आलेल्या या शोने भगवंत मान यांची लोकप्रियता कमालीची वाढवली. कॉमेडी व्यतिरिक्त, भगवंत मान यांनी काही चित्रपटदेखील केले, ज्यात ‘मैं माँ पंजाब दी’ आणि ‘जुगनू हाजीर है’ सारख्या सिनेमांचा समावेश आहे. फार कमी लोकांना माहीत असेल, पण भगवंत मान हे एक खेळाडूदेखील आहेत. ते व्हॉलीबॉलचे खेळाडू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here