नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. निवडणूक झालेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Speech) यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं असून मतदारांचे आभार मानले आहेत. या निवडणुकीवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या विजयात वाटा उचलणाऱ्या घटकांचाही उल्लेख केला आहे.

‘सर्व मतदारांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत आभार मानतो. निवडणुकीत मेहनत घेणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं मी कौतुक करू इच्छितो. सर्वसामान्य नागरिकांनी विशेषता: महिला आणि तरुणांनी भाजपला जोरदार समर्थन दिलं आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांनी भाजपचा विजय नक्की केला,’ असं नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.

UP Election Results 2022 Highlights : उत्तर प्रदेशात कमळाची कमाल, सायकल पंक्चर, हात-हत्ती दोन्हींची दाणादाण

‘उत्तर प्रदेशने इतिहास रचला’

‘आज एनडीएने विजयाचा चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशाने देशाला अनेक पंतप्रधान दिले, मात्र कोणत्याही मुख्यमंत्र्याने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा लगेच दुसऱ्यांदा सत्तेत येण्याची ही पहिलीच घटना आहे. यूपी, गोवा आणि मणिपूरमध्ये सरकारमध्ये असतानाही भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. गोव्यात तिसऱ्यांदा जनतेने सेवेची संधी दिली आहे. उत्तराखंडमध्ये भाजपने नवा इतिहास रचला आहे. आजच्या निवडणूक निकालांनी भाजपच्या कामावर शिक्कामोर्तब केलं आहे,’ असंही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

– आधीच्या सरकारांमध्ये वीज, पाण्यासारख्या मुलभूत गरजांसाठी सरकारी कार्यालयांचे खेटे घालावे लागत होते.
– देशात गरिबांच्या नावावर भरपूर घोषणा झाल्या. मात्र या गरिबांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी सुशासनचं महत्व अधिक आहे आणि भाजपला ही गोष्ट माहीत आहे.
– गरिबांच्या घरी विकासाची गंगा पोहोचवल्याविना मी शांत बसणारा व्यक्ती नाही.
– सरकार चालविताना किती अडचणी येतात, हे मला माहिती आहे. तरीही मी हिंमत केली आणि ती हिंमत लाल किल्ल्यावरुन केली. त्यावेळी मी म्हटलं, भाजपला जिथे जिथे सेवा करण्याची संधी मिळेल, तिथे प्रत्येक गरिबाच्या घरी, अगदी तळातल्या व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजेच. आज निवडणुकीचे निकाल पाहता, माझं स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद आहे.
– महिला, युवक, कष्टकरी सगळ्यांनीच भाजपवर विश्वास ठेवला, ज्यांनी ज्यांनी भाजपला मतदान केलं, त्यांचे मी आभार मानतो. भाजपच्या मोठ्या विजयाला तुम्हा सगळ्यांचा वाटा आहे.
– कार्यकर्ते भाजपच्या विजयाचे सारथी बनले. कार्यकर्त्यांनी दिवस रात्र काम केल्याने हा विजय शक्य झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here