पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत व निदान उत्तर प्रदेशात तरी ‘ऑपरेशन गंगा’ सफल झाले आहे. पंजाब वगळता इतर राज्यांमध्ये भाजपने सत्ता राखली आहे. केंद्रीय सत्ता, देशभरातील भाजपाचे बळ, प्रचंड धनसत्ता, हाताशी असलेली अमर्याद साधनसंपत्ती या बळावर भाजपने हा विजय मिळवला. भाजपच्या विजयाचे विश्लेषण करायचे झाले तर जिथे पर्याय होता तिथे मतदारांनी भाजपला पराभूत केले. पंजाबमधील ‘आप’चा मोठा विजय याचेच निदर्शक आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने स्वत:च्या हाताने सत्ता घालवली. पंजाबचा निकाल काँग्रेसच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांना हवेत तरी मारून चालणार नाही. यापुढे अधिक गांभीर्याने निवडणूक लढवावी लागेल. तर उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांनी आता कुठे लढाईला सुरुवात केली आहे. ती त्यांनी अर्धवट सोडू नये. गोव्यात चांगला जम बसला असतानाही काँग्रेसचा गाडा १२ जागांवर अडून बसला. गोव्यात आप, तृणमूल काँग्रेसने जो पसारा मांडला त्याचा फायदा भाजपला झाला, असे शिवसेनेने म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयावर शिवसेनेचं मत काय?
उत्तर प्रदेशात भाजपने पावणेतीनशेच्या जवळ पोहोचून भाजपाने सगळ्यांना चकीत केले आहे. अखिलेश यादव यांना दीडशेचा टप्पाही गाठता आला नाही. निवडणुकीत मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपाशी अंतर्गत हातमिळवणी करून एकप्रकारे योगीबाबांना मदत केली.
उत्तर प्रदेशातील गंगेच्या प्रवाहात शेकडो प्रेते वाहून जाताना लोकांनी पाहिली, पण त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपाला मतदान केले. लोकांच्या मनात भाजपाविषयी राग होता, लोकांनी भाजपाला मतदान केले नाही, तरीही ते कसे विजयी झाले? हे गौडबंगाल आहे, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले. त्यामुळे भाजप पक्ष कसा काय विजयी झाला? हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लोकशाही व निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असे शिवसेनेने म्हटले आहे.