चार राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे महाराष्ट्रात सत्तापालट होणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आता एकहाती सत्ता आणण्याच्या तयारीला लागल्याचे सांगितले होते. चार राज्यांमधील विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाराष्ट्रात याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. आता आम्ही २०२४ मध्ये भाजपला पूर्ण बहुमताने निवडून आणण्यासाठी तयारी सुरु केली आहे, असे फडणवीस यांनी गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केल्यामुळे भाजप आता शिवसेनेलाही बाजूला ठेवून एकहाती सत्तेसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
गुजरातच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर?
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेला सोबत घेऊन किंवा शिवसेनेशिवाय, असे दोन्ही पर्याय भाजप चाचपून पाहत आहे. यासंदर्भात काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनीही सूचक वक्तव्य केले होते. चार राज्यांतील निवडणुकांतील यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. या आत्मविश्वाचे उन्मादात रुपांतर होऊन भाजप महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करेल. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदार फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ते न जमल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातील. चार राज्यांमध्ये यश मिळाल्यामुळे महाराष्ट्रात लगेच निवडणुका घेतल्यास आपली एकहाती सत्ता येऊ शकते, असे भाजपला वाटत असल्याचे कुमार केतकर यांनी सांगितले.