देशातील उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यासह गोवा, उत्तराखंड, मणिपूर या चार राज्यांत भाजपनं दणदणीत विजय मिळवला. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात अडीचशेहून अधिक जागा जिंकून भाजपची लाट अद्याप कायम असल्याचं दाखवून दिलं. तर गोव्यात स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी, सर्वात मोठा पक्ष बनून सत्तेच्या जवळ भाजप पोहोचला आहे. या विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही पुढच्या संघर्षाची नांदी असल्याचं सांगितलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोव्यातील सर्वसामान्य मतदारांना दिले आहे.
यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या ‘सेने’चे आभार मानतानाच, शिवसेनेला जोरदार टोला लगावला. दुसऱ्या सेनेचे काय झाले हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. भाजपला हरवणार अशी गर्जना काही जण करत होते. पण त्यांची लढाई ही नोटाशी आहे, हे मी आधीच सांगितलं होतं. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रित मते ही नोटापेक्षाही कमी आहेत, असे फडणवीस म्हणाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात जाऊन काहींनी गर्जना केली होती. आम्ही त्यांना पराभूत करू, असे सांगितले होते. पण शिवसेनेच्या उमेदवाराला तिथे अवघी ९७ मते मिळाली. तेथील जनतेचा कौल भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वास दाखवून देतो. कार्यकर्त्यांबरोबरच सामान्य जनतेने मी त्याबद्दल आभार मानतो. या विजयात आपल्याला खारीचा वाटा घेता आला हे माझे सौभाग्य मानतो, असेही फडणवीस म्हणाले.
आता या विजयानं हुरळून जायचं नाही. विजयाने नम्र व्हायचे. आता खरी लढाई मुंबईत होणार आहे, असा निर्धार फडणवीस यांनी केला. मुंबईला कोणत्या पक्षापासून मुक्त करायचं नाही, तर आम्हाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचे आहे. जोपर्यंत मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत शांत बसता येणार नाही. हा विजय आज साजरा करा आणि उद्यापासून कामाला लागा आणि मुंबईत प्रचंड विजय आणि त्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज राहावं, असं फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.