चिपळूण : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण परिसरात ऐन शिमगोत्सवात खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. चिपळूण शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात शिमगोत्सवाची बैठक सुरू असताना पालखीच्या वाटेवरून वाद झाला आणि त्यातून एकावर खूनी हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हल्ला झालेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
या रागातून एकाने त्याच्याच चुलत भावाच्या पोटात चाकूसारख्या धारदार हत्याराने वार केला. या प्रकारामुळे बैठकीला असलेले सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. तर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला झालेली व्यक्ती गंभीरपणे जखमी झाला आहे. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.