म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

करोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊनचे दिवस जसेजसे वाढत आहेत तसा मुंबईमध्ये किराणा मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या पॅकबंद मिठाचा तुटवडा भासत आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईतील बहुतांश किराणा दुकानांमध्ये दोन दिवसांपासून मीठ नसल्याचे चित्र आहे. घाऊक विक्रेत्यांकडे साठा आहे. मात्र मालाची चढउतार आणि ने-आण करण्यासाठी कामगार नसल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.

देशभरात २४ मार्च मध्यरात्रीपासून लॉकडाऊनची अंलबजावणी करण्यात आली. त्याआधी अनेकांच्या घरात काही दिवस पुरेल इतके अन्नधान्य होते, तर काही जणांनी नंतर तजवीज केली. महिनाभर पुरेल इतका साठा करण्यात आला. मात्र अनेकांना मिठाचा विसर पडला. लॉकडाऊनच्या १३-१४ दिवसांच्या कालावधीनंतर लोकांना मिठाची आठवण झाली. तोवर सर्वजण अन्नधान्याची साठवणूक करण्यासाठी हातघाईला आले होते. घरातील मिठाचा डबा जसजसा रिकामा होऊ लागला, तसतसे दुकानांमध्ये मिठाची मागणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढू लागली.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मध्य मुंबई, दक्षिण मुंबई तसेच मुंबईच्या इतर काही भागांमध्ये पॅकबंद मीठ संपले आहे. नामांकित कंपन्यांऐवजी कधी बाजारात न पाहिलेल्या कंपन्यांचे मीठ दुकानदार पुढे करीत आहेत. ताडदेवसारख्या काही भागात तर सुटे जाडे मीठ लोकांना घ्यावे लागत आहे. माल येत नसल्याने मिठाची टंचाई असल्याचे विक्रेते सांगत आहे.

माल असतानाही तो किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवता येत नाही. लॉकडाऊनमुळे कामगारांना घराबाहेर पडता येत नसल्याने ते कामावर येत नाहीत आणि त्याचा फटका वितरणावर होत असल्याचे हा वितरक म्हणाला. तर याबाबत सरकारने लक्ष घालून किराणा मालाचा पुरवठा सुरळीत सुरू राहील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ मीठच नव्हे, तर किराणा मालाच्या दुकानात अनेक जिन्नसही मिळत नाहीत. पुरेसा साठा असताना केवळ कामगारांविना या अडचणी येत असतील तर त्या दूर करायला हव्यात, असे ताडदेव येथील दुकानाबाहेर रांग लावून उभ्या असलेल्या ग्राहकांचे म्हणणे आहे.

माथाडी कामगार मिळेना

मिठाचा साठा घाऊक बाजारात तसेच घाऊक वितरकांकडे मुबलक प्रमाणात आहे. मात्र माथाडी कामगार नाहीत, ही समस्या आहे. त्यातच जे दररोजच्या मजुरीवर काम करणारे मजूर होते, ते गावी निघून गेले किंवा सरकारने व्यवस्था केलेल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे वाहनांमध्ये मालाची चढ-उतार करण्यासाठी माणसे नसल्याचे एपीएमसी बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले. ठाण्यातही दोन दिवसांपासून मीठ मिळत नव्हते. मात्र कालपासून येऊ लागल्याचे ठाण्यातील एक घाऊक वितरक म्हणाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here