Rayat kranti sanghatana agitation : कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम बंद करावी, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अहमदनगरच्या नगर- दौंड रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच रयत क्रांती संघटनेच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव याठिकाणी जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांच्यासह श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

आंदोलनाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी हे आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक शेतकऱ्यांनी महावितरणच्या आश्वासनाशिवाय रास्ता रोको आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे तब्बल दोन तास नगर दौंड रोडवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रब्बीचे पीक आणि फळबागा काढणीला येत असताना कृषी पंपाची वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वीज तोडणी तत्काळ बंद करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली.

कृषी पंपाची वीज तोडणी मोहिम बंद करावी व वीज बिल माफ करावे आणि शेतकऱ्यांना किमान आठ तास दिवसा वीज देण्यात यावी. तसेच दोन टप्प्यात एफआरपीचा शासन निर्णय मागे घेऊन ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी मिळावी. राज्य शासनाच्या कर्ज माफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत थकीत कर्जमाफी मिळावी. या मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

दरम्यान, यावेळी बोलताना सागत खोत म्हणाले की, शेतकऱ्यांनी किती दिवस शांत बसायचे, अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच आहे. जो ऊस कारखान्याने नेला आहे, त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, तर शेतकऱ्यांनी वीज बिल कुठून भरायचे? असा संतप्त सवाल सागर खोत यांनी यावेळी केला. तर रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मांडे म्हणाले की, सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा त्यांनी दिला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here